छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) एका विश्वासू ड्रायव्हरने मालकिणीचा विश्वासघात करत तब्बल ५ लाख रुपयांची रोकड आणि स्कुटी घेऊन पोबारा केल्याची घटना समोर आली आहे. सातारा परिसरातील डिलक्स पार्क येथे शनिवारी (दि. २०) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. विशेष म्हणजे गेल्या ड्रायव्हर तीन वर्षांपासून प्रणिता पुराणिक यांच्याकडे कामाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रणिता दीपक पुराणिक (५०, रा. डिलक्स पार्क, सातारा परिसर) या कॉस्मेटिक खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून प्रणय देशमुख हा चालक म्हणून नोकरीला होता. २० जून रोजी दुपारी प्रणिता पुराणिक यांनी व्यवसायासाठी ५ लाख रुपयांची पिशवी त्यांच्या स्कार्पिओ गाडीत ठेवली आणि चालक प्रणय याला गाडी काढण्यास सांगितले. पिशवी गाडीत ठेवल्यानंतर प्रणिता यांना त्यांचा मोबाईल घरातच विसरल्याचे लक्षात आले. त्या मोबाईल घेण्यासाठी घरात गेल्या. मात्र, जेव्हा घरातून बाहेर आल्या, तेव्हा त्यांना प्रणय हा त्यांची स्कुटी (एमएच-२०-एचआर-७१६४) घेऊन जाताना दिसला. प्रनिता यांनी त्याला मागून आवाज दिला असता, आई, लगेच आलो' असे सांगत त्याने पळ काढला. प्रणिता यांना संशय आला. त्यांनी तातडीने स्कार्पिओ गाडीजवळ जाऊन पाहिले असता, गाडीची चावी तिथेच लावलेली होती, मात्र गाडीच्या सीटवर ठेवलेली ५ लाख रुपयांची कापडी पिशवी गायब होती.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













